नाशिक : मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचा भाग म्हणून एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे कमी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दर्शविल्याने जिल्ह्यात सुमारे दीड लाख मतदारांची दुबार नावे आढळून आली असून, या सर्वांना नोटिसा बजावण्याचे काम केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सोपविण्यात आलेले असले तरी, मतदार यादीत अपूर्ण असलेल्या पत्त्यामुळे दुबार मतदार सापडणे मुश्कील झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व पाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने मतदार पुनर्निरिक्षण मोहीम राबवून मतदार याद्यांचे अद्यावतीकरण केले, त्यात छायांकित मतदार यादी बरोबरच मतदारांचे भ्रमनध्वनी क्रमांकही गोळा करण्यात आले, परंतु एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे असलेल्या मतदारांचे नावे कमी न करण्याची दक्षता आयोगाने घेतली होती. लोकसभा निवडणुकीत लाखो मतदारांचे नावे कमी करण्यात आल्याच्या तक्रारी थेट न्यायालयापर्यंत पोहोचल्याने आयोगाने विधानसभा निवडणुकीत दुबार नावे जैसे थे ठेवण्यात आले होते. आता मात्र निवडणुकीचा माहोल संपल्याने पुन्हा एकवार मतदार याद्यांचे अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात मतदारांचे आधारक्रमांक यादीशी जोडण्याबरोबरच दुबार नावे कमी करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्णातील एकूण मतदारांच्या संख्येत एक लाख ५३ हजार ४४५ मतदारांची एकापेक्षा अधिक ठिकाणी नावे आढळून आल्याने त्यांना निवडणूक शाखेने संभाव्य दुबार नावे असलेले मतदार म्हणून संबोधले आहे. अशा संभाव्य मतदारांना त्यांच्या पत्त्यावर नोटिसा बजावून कोणत्या मतदारसंघात वा केंद्रात नाव ठेवायचे याबाबत विचारणा केली जाणार आहे, परंतु निवडणूक शाखेने तयार केलेल्या नोटिसांवर मतदारांचे पूर्ण पत्ते नसल्याने या नोटिसा बजवायच्या कशा असा प्रश्न केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना पडला आहे. दोन दिवसांपूर्वी या संदर्भात घेण्यात आलेल्या एका बैठकीत केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. मतदारांचे अपूर्ण पत्ते हीच खरी डोकेदुखी असल्याचे केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचे नावे वगळण्याच्या सूचना केल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी अवघड आहे. (जोड आहे)
आधार जोडणीतही अनुत्साह : बीएलओ वैतागले
By admin | Published: May 13, 2015 11:35 PM