दिंडोरी तालुक्यातील पाडे-निगडोळ-ननाशी-बाºहे आदी विविध गावांना जोडणारा जवळचा मार्ग असलेला निळवंडी येथील कोळवन नदीवरील पूल सात-आठ वर्षांपासून रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे तर पाडे निळवंडी येथील शेतकरी विद्यार्थ्यांना चार महिने १५ किलोमीटरचा हेलपाटे घालत प्रवास करावा लागत आहे. आघाडी शासन काळात विशेष सुविधा अंतर्गत सुरू झालेले पुलाच्या कामाची योजनाच भाजप शासनाने गुंडाळल्याने गेले पाच वर्ष पिलरच उभे असून, वारंवार सदर काम वेगळ्या योजनेत मंजूर असल्याचे सांगितले जात आहे. आता तरी या पुलाचे काम होईल अशी अपेक्षा असली तर यंदाचा पावसाळा पुन्हा येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून अन् पुण्याहून पुणतांबा करीतच प्रवास करावा लागणार आहे. तालुक्याच्या पश्चिम भागाला जवळचा मार्ग असलेल्या दिंडोरी-निळवंडी-पाडे मार्गावर कोळवन नदीवर जुनी फरशी असल्याने पावसाळ्यात होणारी अडचण पाहता सात वर्षांपूर्वी मोठ्या पुलाला मंजुरी मिळाली. जुनी फरशी निम्मी तोडत नव्याने पुलाचे कामही सुरू झाले. मात्र पुढे आघाडी शासनाची सत्ता जात भाजपची सत्ता आली व पूल ज्या योजनेत होता ती योजनाच बंद झाली परिणामी तापर्यंत जेवढे काम झाले तेवढ्यावरच काम बंद पडले. सदर हेडच (योजना) बंद झाल्याने गेली पाच वर्षे या कामाचे हेड शोधण्यातच गेले असून, आता कुठे त्याला हेड सापडत सदर पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घातल्याने उर्वरित कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच टेंडर प्रोसेस होत काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, हा पूल रखडल्याने विद्यार्थी व प्रवाशांना वलखेडमार्गे दूरचा प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे सदर पुलाचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी होत आहे.