नाशिक : गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. शेतात काढून ठेवलेले पीक झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी शेतीची कामे खोळंबली असून भाजीपाला पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले आहे.
शहरात अवैध मद्यविक्री जोरात
नाशिक : लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने शहरात अवैध मद्यविक्रीला ऊत आला असून अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अवैध मद्यविक्री होत आहे. पोलिसांचे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
किरकोळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले
नाशिक : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनची राज्य शासनाने पुन्हा मुदत वाढविल्याने किरकोळ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. अनेकांना घरखर्च भागविणे कठीण झाले असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाबाबत संदेशांचा भडिमार
नाशिक : सोशल मीडियावर कोरोनाबाबतच्या संदेशांचा मोठ्या प्रमाणात भडीमार सुरू असून अमुक एक औषध प्रभावी आहे, याप्रमाणे उपाय करावेत, अशा जाहिरातींचाही त्यात समावेश असल्याने अनेकांचा गोंधळ निर्माण होतो. कोरोना झाल्याचे समजल्यानंतर सर्वात प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याप्रमाणे औषधोपचार करावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.