कामगार वसाहतीतील सदनिकांची दुरवस्था
नाशिक : गांधीनगर, नेहरूनगर या कामगार वसाहतींमध्ये असलेल्या अनेक सदनिका रिक्त असल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली असून परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक सदनिकांचे दरवाजे, खिडक्यांची मोडतोड झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे.
कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : लॉकडाऊननंतर गंगाघाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. यामुळे परिसर गजबजला आहे. मात्र अनेक नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायत निकालांमुळे उत्साह
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून या निवडणुकीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. यामुळे नव्या-जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
उपनगर परिसरात फवारणीची मागणी
नाशिक : उपनगर परिसरात काही ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सायंकाळच्या वेळी डासांचा अधिक उपद्रव जाणवतो. यामुळे नागरिकांना रात्री झोप घेणे कठीण होते. परिसरात औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
वातावरणातील बदलामुळे फवारणीचा खर्च वाढला
नाशिक : नाशिक बाजार समितीमध्ये द्राक्षांची आवक सुरू झाली असून द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे. यावर्षी मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. यावर्षी शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्चही वाढला आहे.
रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागात विहिरींनी गाठला तळ
नाशिक : उन्हाळा सुरू होण्यास अवकाश असला तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नियोजन कोलमडले आहे. पाऊस चांगला झाल्याने विहिरींना पाणी राहील, या अपेक्षेने अनेकांनी बागायती पिकांची लागवड केली आहे.
डाळींचे भाव वाढल्याने चिंता
नाशिक : मागील काही दिवसापासून स्थिर असलेल्या डाळींचे भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.