नांदगाव : शहरातील रेल्वेचे फाटक गुरुवारपासून (दि.१८) कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याने नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होणार आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था केल्याशिवाय रेल्वे प्रशासनाने फाटक बंद करू नये, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे.फाटक बंद करण्याची सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फाटकावर लावली आहे. रेल्वे फाटक बंद करण्याच्या मुद्द्यावर प्रशासन ठाम असले तरी पर्यायी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना मध्येच फाटक बंद करण्याच्या निर्णयामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. फाटकाला पर्यायी असलेल्या सब-वेचे काम अपूर्ण आहे. फाटकाला खेटूनच सब-वेच्या कामाअंतर्गत भुयारी मार्गाच्या (डाउन साइडला) बोगदा कटिंग कामाला सुरुवात झाली आहे. हे काम अजून अपूर्ण अवस्थेत असतानाच रेल्वेने कायमस्वरूपी फाटक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने नाराजी पसरली आहे. फाटकाला खेटूनच भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. काम पूर्ण होऊन त्याखालील वाहतूक येवला रस्त्याला संलग्न करण्याचे नियोजनही ठरलेले होते.अप साइडने बोगद्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे.आता कामाला गती देण्यात आली असून भुसावळ डाऊन बाजूच्या लोहमार्गाखालील बोगद्याच्या किटंगकामाला सुरुवात झाली. मात्र या बाजूला बोगदा पूर्ण करून दिल्यानंतर वाहतूक कुठून व कशी काढण्यात यावी यावरून सध्या संभ्रम अवस्था आहे. पालिकेच्या मालकीचे मटण मार्केट तोडून याठिकाणाहून रस्ता व्हावा असा पर्याय पुढे आला असला तरी त्याला मार्केटच्या गाळेधारकांनी विरोध दर्शविला आहे.गाळेधारकांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल व खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. एकूणच कोरोनामुळे उशीर झालेल्या सब-वेला चालना मिळाली असल्याने व रेल्वेचे गेट क्रमांक ११४ बंद करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी नोटीस दिल्याने मोठी खळबळ उडाली.——————————-अतिक्रमणांचा अडसररेल्वे प्रशासन आराखड्यानुसार व मोजमापानुसार काम करून मोकळे झाले, तर संभाव्य पर्यायी मार्गामध्ये अतिक्र मणांचा अडसर आहे. शहरातून वाहनांना मार्ग काढून देताना नगर परिषदेच्या नाकीनव येणार आहेत. तसेच भविष्यात वाहतूक, अतिक्रमणधारक व नगर परिषद यांच्यातला वाद शहरासाठी डोकेदुखी ठरणार असल्याची चिन्हे आहेत.
नांदगाव शहरातील रेल्वे फाटक बंद करण्याच्या सूचनेने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 10:10 PM