घोटी : प्रदेश काँग्रेस नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पत्नी श्रीमती इंदुमती गुळवे यांचे सोमवारी (दि.२७) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे त्यांच्या पार्थिवावर रात्री ९ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोपाळराव गुळवे यांच्यासमवेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस पक्षात सन २००० पासून सक्रिय झाल्या होत्या. इंदुमती गुळवे यांनी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी तसेच तालुक्यातील विकासासाठी विविध स्तरातून हातभार लावला. २००२ साली वाडीवऱ्हे गटातून त्यांनी प्रथमतः जिल्हा परिषद निवडणूक लढली. मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षापदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली, तसेच २०१४ ते २०२१ पर्यंत त्यांनी घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे योगदान दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून विविध सेवाभावी कार्य केले. सोमेश्वर विविध कार्यकारी सोसायटी गंगापूरच्या त्या संचालिका होत्या. याबरोबरच घाटनदेवी गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या त्या विद्यमान चेअरमन होत्या. त्यांनी इगतपुरी तालुक्याच्या तसेच वाडीवऱ्हे गटात विविध विकासाची कामे उपाध्यक्ष असताना पार पाडली.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा बँकेचे संचालक तसेच घोटी बाजार समितीचे मुख्य प्रशासक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदीप गुळवे यांच्या त्या मातोश्री होत.