आरोग्य उपकेंद्रांमध्ये होमिओपॅथी व आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास पूर्ण झालेल्यांना वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक देण्यास आरोग्य खात्याने अनुमती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये सामाजिक आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत या उमेदवारांची प्रवेशपूर्व पररक्षा घेण्यात आली. त्याची गुणवत्तायादी प्रवर्गनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर या उमेदवारांना आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणासाठी पात्र ठरू पाहणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रांची छाननीसाठी नाशिक जिल्हा परिषदेत सोमवारी बोलविण्यात आले होते. राज्यातील बीड, परभणी, लातूर, औरंगाबाद, पुणे, अमरावती, धुळे आदी जिल्ह्यांतून सकाळी आठ वाजेपासून शेकडो उमेदवारांनी त्यासाठी हजेरी लावली. यातील काही महिला उमेदवार आपल्या लहान बाळांसह तर काहींनी आई-वडिलांसह जिल्हा परिषद गाठली होती. आरोग्य विभागाने सकाळी दहा वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात केली. २१७ जागांसाठी ३५३ उमेदवारांना त्यासाठी पाचारण करण्यात आले. आरोग्य उपसंचालक मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, अतिरिक्त आरोग्य अधिकारी दावल साळवे आदींनी या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्याबरोबरच, त्यांना आगामी सहा महिन्यांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराला यावेळी पाचारण करून त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण केंद्राचे वाटप करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत कायम होती. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या उमेदवारांना ताटकळावे लागले. सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा या उमेदवारांची परीक्षा होवून त्यांची समुपदेशनाने रिक्त आरोग्य केंद्रांवर नियुक्ती देण्यात येणार आहे.
(फोटो १५ झेडपी)- जिल्हा परिषदेत उमेदवारांची झालेली गर्दी.