घोटी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकडाउननंतर ग्रामीण भागात रोजगार बंद झाल्याने इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला असताना काही संस्था, संघटना मदतीचा हात पुढे करीत आहेत. इगतपुरी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात अजूनपर्यंत सेवा पोहोचली नसल्याने वाड्या-पाड्यांवर ज्या ठिकाणी रस्ते नाहीत अशा दुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी अन्नछत्र तसेच किराणा वाटप करण्यात आला असून, २०० कुटुंबांना किराणा व ६००हून अधिक आदिवासी बांधवांना भोजनव्यवस्था करण्यात आली. दुर्गम भागाबरोबरच शेणवड बुद्रुकच्या वाड्या व वैतरणा भागातील धारगाव परिसरातील कडाडवाडी, कोरडवाडी, धाराचीवाडी, पराधवाडी, खांडीचीवाडी, साफ्याची वाडी, वाघ्याचीवाडी या परिसरात लहान-मोठ्या वाड्यांवर गरजूंना किराणामालासह आवश्यक सामग्री भारतीय जनता पार्टीचे उपतालुकाध्यक्ष नीलेश कडू यांच्यासह मोरया ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केली. इगतपुरी तालुक्यातील दुर्गम भागात जाऊन सेवा पुरविण्याचा अनोखा उपक्रम कडू यांनी हाती घेतला असून, दररोज सेवा दुर्गम भागात राबविल्या जाणार असल्याचे कडू यांनी सांगितले.याप्रसंगी धारगावचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद पारधी, मोरया सोशल ग्रुपचे अक्षय कडू, भगीरथ कडू, शिवशंकर बरकले, मोहन चव्हाण, दीपक कडू, गणेश कडू, एकनाथ कडू, संजय कडू, तेजस कडू, उमेश कडू आदी उपस्थित होते.
अतिदुर्गम भागात किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 8:25 PM