नाशिक : कोरोना खूप वेगाने पसरू लागल्याने तसेच १ एप्रिलपासून शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लसींच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. जिल्ह्यातील काही केंद्रांवर लस संपल्याचे प्रकारदेखील घडले तर काही केंद्रांवर शे-दीडशे लस दिल्यानंतर साठा संपुष्टात आला होता. दरम्यान गुरुवारी जिल्ह्याला १ लाख ९० हजार असा आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा लससाठा प्राप्त झाल्यानंतर त्याचे जिल्ह्यात सर्व लसीकरण केंद्रांवर वितरण करण्यात आले.
जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला लस कमी पडण्याचे प्रकार गत दोन आठवड्यांपासून घडत असताना १ एप्रिलपासून तर लसींचा तुटवडा अधिकच भासण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. ती प्रत्यक्षात १ एप्रिलला सकाळीच खरी ठरली. महानगरातील बहुतांश केंद्रांवर लस उपलब्ध नव्हती. तर ग्रामीणच्या काही केंद्रांवर उपलब्ध तर काही केंद्रांवर संपुष्टात आल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. यापूर्वी जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सातत्याने लसींचा साठा केवळ दोन-तीन दिवसांपुरताच उपलब्ध राहत होता. त्यात कोरोना वाढू लागल्यावर नागरिकांकडून लसीच्या मागणीतही वाढ झाल्याने गत दोन-तीन आठवड्यांपासून साठ्याबाबत सातत्याने अनिश्चिततेची स्थिती कायम होती. त्यामुळे इच्छा असून आरोग्य विभागाला लसीकरणाला अधिक वेग देणे शक्य होत नव्हते. कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला होता. त्यानुसार लसीकरण केंद्रेदेखील वाढविण्यात आली होती. त्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय झाल्याने लस इच्छुकांच्या संख्येत पहिल्या दिवसापासून प्रचंड मोठी वाढ अपेक्षित होती. त्याप्रमाणे अनेक इच्छुकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती.
इन्फो
मार्चअखेर १२ हजार, आता २० हजार
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज सुमारे १२ हजारांवर नागरिकांचे लसीकरण सुरू होते. त्यात वाढ करण्यासाठी तितक्या मुबलक प्रमाणात लसींचा स्टॉकदेखील उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता होती. मात्र, आता पुरेशा प्रमाणात स्टॉक उपलब्ध झाल्याने किमान पुढील आठवड्याहून अधिक कालावधीसाठी २० हजार लसीकरण करणे शक्य होणार आहे.
इन्फो
पण मिळाले होते ४० हजार
नागरिकदेखील कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लस घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत. त्यामुळे या मागणीतही दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दिवसाला किमान २० हजार याप्रमाणे आठवडाभरासाठी किमान दीड लाख लस मिळणे आवश्यक असल्याने नाशिक मनपाकडून दीड लाख लसींची मागणी गत महिन्यातच करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी प्रत्यक्षात मात्र ४० हजारच लस मिळाल्याने वारंवार लसींचा तुटवडा होऊन काही केंद्रांवर लस न मिळण्याचे प्रकार घडू लागले होते.