नाशिक: ज्यांची उपजीविका वर्षानुवर्षे वनजमिनीवर आणि नैसर्गिक साधनसामग्रीवर अवलंबून आहे. तसेच जे आदिवासी बांधव वनजमिनीवर पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहेत, अशा आदिवासी बांधवांना वनाचे अधिकार देण्याबाबत असलेल्या वनहक्क कायद्यांर्गत जिल्ह्यात सुमारे २१ हजार हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. वनहक्काच्या अधिकारासाठी जिल्हा समितीकडे ५२, २८३ इतके प्रकरणे प्राप्त झालेली होती, त्यापैकी ३१ हजार ८८० प्रकरणे मंजूर झालेले आहेत.
वनहक्क कायदा, २००६ नुसार वनांमध्ये अधिवास असणाऱ्या समुदायांना जमिनीचे अधिकार आणि वनांचे व्यवस्थापन आणि संवर्धन करण्याचा हक्क देण्यात आला आहे. पारंपरिक पद्धतीने वनजमिनीवर शेतीच्या माध्यमातून उपजीविका करणाऱ्यांना वनहक्काचा आधार मिळाला आहे. १३ डिसेंबर २००५ पूर्वी शेतजमीन कसणाऱ्यांना वनहक्क पट्टे वाटप करण्यात येते. त्यानुसार जिल्हा समितीकडे वैयक्तिक तसेच सामूहिक दावे दाखल केले जातात. त्यातून पात्र दावेदारांना वनजमिनीचे अधिकार बहाल केले जातात. जिल्ह्यात २००८ पासून सुमारे ५२ हजार २८३ इतकी प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ३१ हजार ८८० प्रकरणे मंजूर केली आहेत. वर्षानुवर्षे जंगलात राहणाऱ्या आणि वनजमीन कसणाऱ्यांनी शेतीच्या माध्यमातून वनजमीन राखली आहे. पूर्वापार शेती करणाऱ्यांचे हक्क आबाधित राहावे तसेच इतरांकडून वनजमिनींचे अतिक्रमण होऊ नये, यासाठी जमीन कसणाऱ्या आदिवासी बांधवांना तसेच समुदायाला वनाचे हक्क देण्याचा कायदा असल्याने त्यामाध्यमातून त्यांना वनपट्टे अधिकृत करून दिले जातात.
नाशिक जिल्ह्यात सन २००८ पासून ५२ हजार २८३ इतकी प्रकरणे दाखल झाली होती. जिल्हा समितीकडे प्राप्त झालेल्या दाव्यांपैकी १९,८९८ दावे फेटाळून लावले आहेत. कागदपत्रे तसेच पुराव्यांचा अभाव असल्याने त्यांचे दावे अमान्य करण्यात आले आहेत तर ३१ हजार ८८० दावे मान्य केले आहेत. मान्य करण्यात आलेल्या ३१ हजार वैयक्तिक दाव्यांपैकी २१, ६१० हेक्टर वनक्षेत्र वाटप केलेले आहे. त्यामुळे आता त्यांना अधिकृत संबंधित वनजमिनीचे अधिकार मिळालेले आहेत. पात्र, दाव्यांपैकी २९,६८९ दावेदारांना वनहक्क लागू करण्यात आल्याबाबतचे प्रमाणपत्रदेखील अदा करण्यात आले असून येत्या मार्च अखेर उर्वरित २१९१ प्रकरणांचे वनहक्क प्रमाणपत्रे तयार करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
--इन्फो--
सातबारा उताऱ्यावर नोंदी
वनहक्क दावे मंजूर झालेल्या ३१ हजार ८८० आदिवासी बांधवांची नावेदेखील सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात आलेली आहेत. जवळपास २५ हजाार १३० जणांच्या सातबारा नोंदी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत तर उर्वरित ४५५९ प्रकरणांमध्ये नावे उताऱ्याला लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या मार्चअखेर त्यांची देखील नावे सातबारा उताऱ्यावर घेतली जाणार आहेत.
===Photopath===
260221\26nsk_19_26022021_13.jpg
===Caption===
वनहक्क प्राप्त आदिवासी बांधव