नाशिक : पोटात जंत झाले की केवळ भूक मंदावणे तसेच वजन कमी होण्यासारख्या समस्यांबरोबरच फुप्फुसाचे आजारही होऊ शकतात. त्यामुळेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांना जंताच्या गोळ्या देऊन जंत होऊ नयेत, याबाबत दक्षता घेतली जाते; मात्र गत वर्षभरापासून शाळाच बंद असल्याने जंत गोळ्यांचे वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहे.
पूर्वी लहान मुलांच्या पोटात जंत होऊ नयेत, यासाठी घरगुती औषधे दिली जात. आता प्रभावी औषधे निघाली असली तरीही पुरेशी माहिती नसल्याने ती मुलांना दिली जात नाहीत. मोठ्या आकाराचे जंत पोटाच्या आतड्यांमध्ये राहून तिथे एका विशिष्ट प्रकारचा गोळा तयार करतात. पोटात दुखणे, मळमळणे यांसारखा त्रास त्यामुळे होऊ शकतो. काही प्रकारचे जंत उलट्या बाजूने शरीरात फुप्फुसांत जातात. तिथे राहिल्याने श्वसनमार्गाचे विविध प्रकारचे त्रास वाढवतात, लहान मुलांना सहा महिन्यांतून एकदा जंतांचे औषध द्यायला हवे, यावर बालरोगतज्ज्ञांचा कटाक्ष असतो.
इन्फो
शाळा, अंगणवाडी केंद्रांवर होणार वितरण
अल्बेंडोझॉल ही लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी सुरक्षित जंतनाशकाची गोळी मानली जाते. जंतनाशक औषधामुळे होणारे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे आहेत. केवळ काही जणांनाच सौम्य प्रमाणात चक्कर येणे, मळमळणे, उलटी होणे किंवा डोके दुखी, पोटदुखी व थकवा यांचा समावेश आहे. हे दुष्परिणाम जंत संसर्गामुळे व त्यावर होणाऱ्या औषधाच्या परिणामामुळे होतात. ते तात्पुरते असून, शाळा व अंगणवाडी केंद्रावर सहजगत्या हाताळण्यासारखे आहेत. त्यामुळेच सप्टेंबरअखेरपासून या गोळ्या अंगणवाडी केंद्रांवर वितरित केल्या जाणार आहेत.
इन्फो
काय आहे जंतदोष
वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमी दोषांचा संसर्ग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जंक फूडचा मारा, खालावलेली रोगप्रतिकारशक्ती, पालेभाज्या, फळांवर मारलेली काट यामुळे लहान मुलांमध्येही जंत होण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छतेच्या सवयींचा अभाव त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरतो.
इन्फो
सज्ञान होईपर्यंत गोळ्या
कृमीदोष हे कुपोषण व रक्ताशयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात. तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटण्याची शक्यता असते. त्यामुळेच या गोळ्या बालकांना पौगंडावस्थेपर्यंत तर काही उदाहरणांमध्ये मुले सज्ञान होईपर्यंत देणे अत्यावश्यक असते.
इन्फो
आरोग्य अधिकाऱ्यांकडूनच प्राप्त होतात गोळ्या
प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच या जंतगोळ्या संबंधित यंत्रणांना दिल्या जातात. त्यानंतर त्या गोळ्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून त्या गावातील, पाड्यावरील शाळेत किंवा अंगणवाडीतील बालकांना दिल्या जातात.