नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२०-२१ परीक्षेचे गुणपत्रक व इतर साहित्य संबंधित उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना शुक्रवारपासून (दि. २०) वितरित करण्यात येत असून शनिवारी नाशिक जिल्ह्यासह विभागातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांनाही निकाल साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवारपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात त्यांच्या गुणपत्रिका मिळणार आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या गुणपत्रिका व निकालासंबंधीच्या साहित्याचे शुक्रवारी (दि. २०) केवळ नाशिकच्या वाटप केंद्रावर वितरण करण्यात आले. त्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील उर्वरित सर्व केंद्र व धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांमध्येही शाळांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात गुणपत्रिका मिळू शकणार आहे. या गुणपत्रिकांचे वाटप करताना शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही विभागीय मंडळाने केल्या आहेत. दरम्यान, ज्या शाळांना गुणपत्रिका प्राप्त झाल्या आहेत त्यातील काही शाळांनी बारावीच्या गुणपत्रिकांचे विद्यार्थ्यांना वाटप सुरू केले आहे. परंतु, शनिवार व रविवारमुळे गुणपत्रिकांचे वाटप खऱ्याअर्थाने सोमवारपासूनच सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे.