विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
पेठ : कोरोना साखळी खंडित करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी पेठ पोलीस रस्त्यावर उतरले असून, शुक्रवारी शहरातून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. अत्यावश्यक सेवेचा सबळ पुरावा नसल्यास माघारी पाठविले जात असून, पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील स्वतः रस्त्यावर उतरल्याने प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे.
४४ गरजू कुटुंबांना किराणा साहित्य वाटप
पेठ : कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आदिवासी भागातील वाडी वस्तीवरील निराधार, दिव्यांग, विधवा, वृद्ध कुटुंबांची उपासमार होऊ नये यासाठी पेठ, सुरगाणा, त्र्यंबक भागात सामाजिक कार्य करणाऱ्या आपली आपुलकी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे मार्गदर्शक दौलतराव कुशारे व नंदाताई कुशारे यांच्या आर्थिक दायित्यातून वाघेरापाडा, कोणे, साप्ते भागातील ४४ कुटुंबांना किराणा साहित्य व दक्षिणा वाटप करण्यात आली. गिरणारे येथील सामाजिक कार्यकर्ते राम खुर्दळ यांचे हस्ते शनिवारी मदतीचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी शांताराम चौधरी, विष्णू माळेकर, खंडेराव डावरे, तुषार पिंगळे, सागर शेलार, किरण उदार, साहेबराव सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.