खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. खरिपासाठी पीककर्ज वितरण करण्यात विविध बँकांनी हात आखडता घेतल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. राष्ट्रीयीकृत बँका दारात उभ्या करीत नसल्याने अनेक शेतकरी आपल्या कारभारणीचे सौभाग्याचे लेणे बँकांकडे गहाण ठेवून खरिपासाठी भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पीककर्ज वितरणाबाबत राष्ट्रीयीकृत बँकांकडून दिरंगाई होत असून यंत्रणेच्या या दिरंगाईने अनेक शेतकऱ्यांत पीककर्जापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. याचा परिणाम शेतकरी व खरीप हंगामावर होणार असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी वेळेवर पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने येवला तालुक्यात दोन- तीन वेळेस बऱ्यापैकी हजेरी लावल्याने शेतमशागतीची कामे सुरू झाली आहेत. आता फक्त बियाणे, खते, घेणे बाकी आहे. मात्र, शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. धडपड करूनही बँकांच्या उदासीन धोरणापायी आपली जमीन गहाण ठेवूनही पीककर्ज मिळत नसल्यामुळे शेतकरी पैशासाठी वणवण भटकंती करताना दिसत आहेत.
आधीच दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या तालुक्याला गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसाने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेल्याने केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जाऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करीत जीवन जगत आहेत. त्यातच मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या नव्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतमाल व भाजीपाला पिके शेतातच सडून गेला आहे. अशाही परिस्थितीत आपली पत व बँकेचे मागील वर्षाच्या पीककर्जाची परतफेड करण्यासाठी उधार, उसनवार प्रसंगी खासगी सावकारांकडून व्याजाने रक्कम काढून कर्ज परतफेड केले आहे. असे असताना बँक शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करून विलंब करीत असल्याने खरीप हंगामासाठी भांडवल कसे उपलब्ध करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आ वासून उभा ठाकला आहे.
कोट...
येवला तालुक्याला खरीप हंगामासाठी पंचेचाळीस कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्याचे नियोजन असून आजमितीस पंधरा कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. कोणीही सभासद शेतकरी पीककर्जापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. सोसायटी सचिवांना सूचना देण्यात आल्या असून लवकरच सर्व कर्ज वितरण उद्दिष्ट पूर्ण करून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.
- एकनाथ पाटील, सहायक निबंधक, येवला
कोट...
येवला तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याची वस्तुस्थिती आहे. शेतकरी दररोज बँकेत कागदपत्र जमा करण्यासाठी चकरा मारीत आहेत. बँकांनी आडमुठेपणाची भूमिका न घेता पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
- संतू पाटील झांबरे, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना, येवला