जायखेडा : येथील ग्रामपंचायतीकडून मध्य प्रदेशातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मध्य प्रदेशातील दहा ते बारा कुटुंबे छोट्या-मोठ्या व्यवसायानिमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून जायखेडा येथे खुल्या जागेवर झोपड्या बांधून तात्पुरते वास्तव्यास आहेत. लॉकडाउनमुळे यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. गावी परत जाता यावे यासाठी ते ग्रामपंचायतीशी संपर्क साधून मदतीची मागणी करीत आहेत, मात्र अशा परिस्थितीत गावी परत जाणे शक्य नसल्याने त्यांची उपासमारीची टाळण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच शांताराम अहिरे, उपसरपंच संदेश मोरे, ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्यासाठी गोडेतेल, साखर, चहा, तेल, मीठ, मिरची, हळद, मसाला, साबण, डाळी आदी किराणा मालाची व्यवस्था करून दिली. याचबरोबर रेशन दुकानातून गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी रेशन दुकानचालक सुमित अहिरे, शाकिर शेख, पांडुरंग जगताप यांचे सहकार्य लाभले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, मंडळ अधिकारी एस. के. खरे, तलाठी एस. बी. घोडेराव, वाय. आर. मेश्राम आदी उपस्थित होते.गावातील इतर गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचे ग्रामपंचायतीच्या विचाराधीन असून, सदर गरजू लोकांचे सर्वेक्षण ग्रामपंचायत कर्मचारी हरी शेवाळे, मसूद पठाण, कोतवाल संदीप पानपाटील करीत आहेत.
जायखेड्यात जीवनावश्यक वस्तंूचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 11:02 PM