युवा सेनेच्यावतीने रक्तदान शिबिर
नाशिक : देवळालीगाव येथे शिवसेना आणि युवा सेनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले होते. या शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, योगेश घोलप, जयश्री खर्जूल, सुनीता कोठुळे, ज्योती खोले आदी उपस्थित होते.
गिरणारे येथे बियाणे विक्रेत्यांचे लसीकरण
नाशिक : गिरणारे परिसरात बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे लसीकरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकर, सरपंच अलका दिवे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार परिसरातील शंभरपेक्षा अधिक विक्रेत्यांचे लसीकरण करण्यात आले.
थकबाकीदारांना मनपा पाठविणार नोटिसा
नाशिक : मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. शहरातील विभागीय मनपा कार्यालयाच्यावतीने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने मे महिन्यात कर भरण्यासाठी सवलत जाहीर करूनही मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे आता नोटिसीची कारवाई केली जाणार आहे.
उपनगर कॉलनीतील मद्द्य दुकानांसमोर हाणामारी
नाशिक : उपनगर कॉलनीत असलेल्या मद्द्याच्या दुकानांसमोर तरुणांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी येथील मद्द्याच्या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करीत दुकान नियमबाह्य पद्धतीने सुरू ठेवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती. या परिसरात नेहमीच मद्द्यपींमध्ये हाणामारी होत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे.
बिटको रुग्णालयातील रुग्ण घटले
नाशिक : बिटको रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात शहरासह आजुबाजूच्या खेडेगावांतील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. विशेषत: कोरोनाच्या काळात बिटकोत बेडस पूर्णपणे भरल्याने बेड्स उपलब्ध देखील होत नव्हते. आता मात्र कोविड सेंटरमध्ये अवघे ६९ रुग्ण उपचार घेत आहेत.
मोफत योग प्रशिक्षण शिबिर
नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शासनाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार मविप्र संस्थेचे केएसडब्लू महाविद्यालय आणि योगिक सायन्स असोसिएशन यांच्यावतीने योग प्रशिक्षण शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. मंगळवापासून या वर्गाचा शुभारंभ झाला. हे शिबिर झूमद्वारे घेतले जात आहे. सहभागी होण्यासाठी क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.