नायगाव : येथील शिधापत्रिका-धारकांकडून अडीचशे गरजूंना २५०० किलो धान्यवाटप करून माणुसकी धर्माचा व संकट काळात मदतीचा नवा आदर्श घालून देण्यात आला.गेल्या महिनाभरापासून देशासह संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे बंद झाल्याने मजुरी करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने रेशनच्या माध्यमातून नागरिकांना तीन महिने मोफत धान्य वाटप करण्याचे जाहीर केले. मात्र गावातील शेकडो नागरिकांचे रेशनकार्ड आॅनलाइन नाही तर अनेकांना अन्य कारणांमुळे हे धान्य मिळत नसल्यामुळे नायगाव खोºयात संताप व्यक्त होत आहे. अशा लॉकडाउनच्या काळात शेकडो नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबतीत सरपंच नीलेश कातकाडे व पोलीसपाटील जोत्स्ना पानसरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांच्या विनंतीवरून अनेक शिधापत्रिकाधारकांनी आपल्या रेशनच्या धान्यातून काही धान्य संबंधिताना देण्याची इच्छा व्यक्त केली.अशा प्रकारे नुकतेच गावातील गरजू कुटुंबाना प्रत्येकी दहा किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात आले. या कुटुंबाच्या चुली पेटविण्याचे काम या माध्यमातून झाल्याने नायगाव खोºयात समाधान व्यक्त होत आहे.
शिधापत्रिकाधारकांकडून गरजूंना धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 9:04 PM