मालेगाव :- शासनाच्या निर्देशानुसार मे महिन्याचे माेफत धान्य रास्त भाव दुकानदारांकडे उपलब्ध झाले आहे. अंत्याेदय, प्राधान्य कुटुंब व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न याेजनेंतर्गत लाभार्थ्यांना गहू व तांदूळ माेफत दिले जाणार आहे. शनिवारपासून धान्य वाटपास सुुरुवात झाली असून, तीन टप्प्यांत धान्य वितरण हाेणार असल्याची माहिती धान्य वितरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गाेरगरीब कुटुंबांना उदरनिर्वाहाची चिंता असल्याने सरकारने माेफत धान्य वाटपाची घाेषणा केली आहे. त्यानुसार मे महिन्याचे धान्य प्राप्त झाले आहे. अंत्याेदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना ८ ते २० मे दरम्यान माेफत धान्य दिले जाईल. २१ ते ३१ मे पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न याेजनेतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप केले जाणार आहे. १० ते ३१ मे दरम्यान लाभापासून वंचित राहिलेल्या अंत्याेदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाईल. गहू व तांदूळ माेफत असून, अंत्याेदय कार्डधारकांना प्रतिकार्ड एक किलाे साखर वीस रुपये दराने देण्याचे निर्देश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी धान्य घेताना दुकानांमध्ये गर्दी करू नये, चेहऱ्यावर मास्क लावून फिजिकल डिन्स्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कमी धान्य देणे, जास्त पैशांची मागणी करणे, धान्याची पावती न देणे आदी प्रकारच्या तक्रारी असल्यास लाभार्थ्यांनी धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे सादर कराव्यात. तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जाणार असल्याचे धान्य वितरण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
-----------------------
असे मिळेल धान्य
अंत्याेदय याेजनेद्वारे २५ किलाे गहू, दहा किलाे तांदूळ व एक किलाे साखर मिळेल. प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य ३ किलाे गहू, दाेन किलाे तांदूळ, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न याेजनेंतर्गत प्रति सदस्य ३ किलाे गहू व दाेन किलाे तांदूळ दिले जातील. ८२ क्विंटल चना डाळ वाटप केली जाणार असून, जाे कार्डधारक अगाेदर येईल त्याला डाळ दिली जाणार आहे.