नाशिक : आर्थिक मागास प्रवर्गाचे १० टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला मिळालेले १६ आरक्षणामुळे आरक्षण तक्ता तयार करण्यास झालेल्या विलंबामुळे लांबलेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाला बालभारतीकडून अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिका मिळण्यास सुरुवात झाली असून, रविवार (दि.१६) पर्यंत माहिती पुस्तिके च्या सुमारे १७ हजार प्रति प्राप्त झाल्या असून, सोमवारपासून कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळांना या माहिती पुस्तिकांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.आरक्षण तक्ता तयार करण्याच्या कामातील विलंबामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या माहिती पुस्तिकेचे कामही खडले होते. परंतु हा संभ्रम दूर झाल्यानंतर माहिती पुस्तिकांच्या छपाईचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे बालभारतीकडून संबंधित शिक्षण उपसंचालक कार्यालयांना माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिल्या जात असून, नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाला रविवारपर्यंत १७ हजार माहिती पुस्तिका प्राप्त झाल्या आहेत. शिक्षण उपसंचालकांनी नशिक शहरातील अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी सुमारे ३० हजार माहिती पुस्तिकांची मागणी केली आहे. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यात १७ हजार पुस्तिका बालभारतीकडून प्राप्त झाल्या असून, उर्वरित माहिती पुस्तिकाही सोमवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारपासून तत्काळ या माहिती पुस्तिकांचे महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालये व माध्यमिक शाळांना वाटप सुरू करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर केले जाण्याची शक्यता असून, या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका खरेदीनंतर त्यातील माहितीचा वापर करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसेच दहावीच्या निकालापूर्वीच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एकही भरून देणे शक्य होणार असून, निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत लांबली प्रक्रियानाशिक महापालिका परिसरात गेल्या वर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी दि. २० एप्रिलपासून आॅनलाइन प्रक्रियेस सुरुवात झाली होती, तर दि. १० मेपासून विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वितरण सुरू झाले होते. परंतु यंदा मे महिन्याचा शेवटच्या सप्ताहापर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागली. आता शिक्षण उपसंचालक कार्यालयास माहिती पुस्तिका प्राप्त झाल्याने विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा लवकरच संपणार असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने आगामी काळात लवकरात लवकप प्रक्रिया पूर्ण करण्याची अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त होत आहे.
शाळांना माहिती पुस्तिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:20 AM