एकलहरे : भारतात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी कायदा करून दंडात्मक कारवाई सुरू करावी लागली. घनकचऱ्याची समस्या ही मानवाच्या मानसिक अराजकातून निर्माण झालेली असून, घनकचरा व्यवस्थापनेतून खत निर्मिती व्हावी. त्यामुळे भविष्यात घनकचरा आर्थिक व्यवस्थेचा भाग बनेल, असा विश्वास कर्जत नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तथा पर्यावरणप्रेमी रामदास कोकरे यांनी व्यक्त केला.नाशिक शहरात सलग दहाव्या वर्षी आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत मंगळवारी वसुंधरा पुरस्कारांचे वितरण एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र येथे झाले, त्यावेळी कोकरे बोलत होते. यावेळी पर्यावरणप्रेमी अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पगारे आणि पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले.कोकरे पुढे म्हणाले की, डम्पिंग ग्राउंड्सवर कचºयाचे ढीग वाढतच आहेत. दुर्गंधीसोबतच त्या ढिगांना आग लागून हवा प्रदूषण होत आहे. घनकचरा धोकादायक आहे. डंपिंग ग्राउंडमध्ये कचराच ठेवायचा नाही, असे धोरण मी स्वीकारले. लोकांमध्ये जनजागृती, प्लॅस्टिकला पर्याय आणि कायद्याचा वापर या त्रिसूत्रीचा वापर केल्यानेच कर्जत नगरपरिषदेने खत निर्मितीसाठी प्रकल्प विकसित केला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महोत्सवाचे दिग्दर्शक वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव यांनी, येत्या गांधी जयंती म्हणजेच २ आॅक्टोबरपासून भारतात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी येणार असल्याने त्याचा वसुंधरा महोत्सवास हातभार लागणार असल्याचे सांगितले. यावेळी वसुंधरा पुरस्कार प्राप्त पर्यावरणप्रेमींनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी, गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता आणि हरितकरणाचे काम सुरू असून, एका तक्रारीवर उपाय शोधतांना काही ध्येय निश्चित केली त्याची फलनिष्पत्ती झाल्याचे सांगितले.या समारंभानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘द वर्ल्ड मोस्ट फेमस टायगर’ व ‘नल्लामुत्थू’ दिग्दर्शित माहितीपटाच्या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली. एनटीपीसी वसाहतीतील मुलांनी तयार केलेल्या प्लॅस्टिक पुराणवापर वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.महोत्सवातील दुपारºया सत्रात विविध मार्गदर्शन तसेच कार्यशाळा घेण्यात आल्या. मविप्रच्या समाजकार्य महाविद्यालयात छायाचित्रकार समीर बोंदार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली छायाचित्रण कार्यशाळा पार पडली. यात आधुनिक फोटोग्राफीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यात ५० हून अधिक हौशी छायाचित्रकार उपस्थित होते.
किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:52 AM