नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत अद्याप गुणपत्रिकी प्राप्त झालेल्या नाही. विद्यार्थ्यांना या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. ३१) दुपारी तीन वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत महाविद्यालयांना गुणपत्रिका वितरीत करण्यात येणार असून, त्यासाठी विभागीय शिक्षणमंडळाने ११ वाटप केंद्र निश्चित केले आहेत.बारावीचा निकाल ऑनलाइन जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागली होती. या गुणपत्रिका शनिवारीच (दि.२५) विभागीय मंडळाला प्राप्त झाल्या होत्या. त्यांचे माहाविद्यालयनिहाय वर्गीकरण व पडताळणी करून विद्यार्थ्यांना ३१ जुलै रोजीपासून गुणपत्रिका वितरत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ३० जुलै रोजी तालुकानिहाय गुणपत्रिकांचे वितरण केले जाईल. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे प्राचार्यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर निकालपत्रक वितरित करताना शासकीय नियमांचे पालन करावे. गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी, तसेच विशिष्ट तारखेलाच गुणपत्रक घेऊन जावे, असा आग्रह महाविद्यालयांनी करू नये, अशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली आहे.
निकालपत्र वाटपाचे नियोजनबारावीचे निकालपत्र महाविद्यालयांना गुरुवारी (दि.३०) सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत शिक्षण मंडळाकडून वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय मंडळाने तालुकानिहाय नियोजन केले असून, दिंडोरी, सिन्नर, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर, कळवण, इगतपुरी, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यांचे निकाल नाशिक विभागीय मंडळातच मिळणार आहेत, तर चांदवड, देवळा, मालेगाव ग्रामीण, सटाणा व मालेगाव शहरातील निकालपत्रक मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, स्वप्नपूर्तीनगर, भोकरमळा, सोयगाव, मालेगाव येथे मिळतील. नांदगाव व येवलाचे निकाल संत बार्णबा हायस्कूल मनमाड येथे वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.