नाशिक : कोरोना आजारापासून सुरक्षित राहण्यासाठी ‘मेट भुजबळ नॉलेज सिटी’च्या विद्यार्थ्यांनी स्वत: मास्क शिवून वाटप करण्याचा उपक्रम राबविला. तसेच ‘डिस्टन्स’चे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने निधी उभारून त्याद्वारे अन्नधान्य खरेदी करत ते चांगल्या वातावरणात शिजवून भोजनाचे पॅकेट्स तयार करत गरजू लोकांपर्यंत पोहोचवून सामाजिक बांधिलकी जोपासली. नाशिक शहरातील तपोवन, गोदाकाठ, पंचवटी, आडगाव, गंगापूरगाव या भागातील गरजूंना भोजन पुरविले. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम अद्यापही सुरूच आहे. लॉकडाउन काळात गरजूंपर्यंत भोजन पुरविण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून मास्कचाही पुरवठा केला जात आहे. इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीचे विद्यार्थी व कर्मचारीवर्गाने सॅनिटायझर निर्मितीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. कमी खर्चात अधिक प्रभावी व परिणामकारक सॅनिटायझर तयार केले जात असून, लवकरच ते नागरिकांपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. कोरोना या आजाराबद्दल वैज्ञानिकदृष्ट्या योग्य ती माहिती घेण्यासंदर्भात बऱ्याच संस्थांकडून किंवा तज्ज्ञांकडून क्विज प्रोग्राम घेण्यात आले. तसेच माहिती देण्यासाठी आॅनलाइन तज्ज्ञांनी सेशन्स घेतले. यामध्ये विद्यार्थी व स्टाफ यांनी उत्साहाने भाग घेऊन महत्त्वपूर्ण माहिती समजावून घेतली, ती सुटसुटीत स्वरूपात मुद्देसूदपणे मांडून त्याद्वारे भित्तीपत्रके तयार केली. सोशल मीडियाच्या आधारे हे जनजागृतीपर पोस्टर्स सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात आले. एकूणच कोरोनाला हरवायचयं, आपण जिंकायचयं असा निश्चय ‘मेट’च्या विद्यार्थ्यांसह शिक्षकवर्गाने केला आहे.
‘मेट’च्या विद्यार्थ्यांकडून मास्कचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 9:23 PM