नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत बारावीपर्यंतच्या सर्व मुली व पहिली ते आठवीपर्यंत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या जमातीतील सर्व मुलांना मोफत गणवेश व पुस्तकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. मोफत गणवेशाचे वाटप करण्यासाठी ९ कोटी ८८ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते गटस्तरावर वितरित करण्यात आले आहे. साडेपाच लाख विद्यार्थ्यांसाठी २९ लाख ९१ हजार पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. उद्या (दि.१५) शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी जिल्हास्तरावरून १७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात पंधरा पंचायत समित्यांसाठी १५ व नाशिक तसेच मालेगाव महापालिकांसाठी दोन स्वतंत्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत २०१६-१७ साठी मोफत गणवेश अनुदान वाटप करण्यासाठी ९ कोटी ८८ लाख ७४ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून १ लाख ४५ हजार ८६५ विद्यार्थिनी तसेच ११ हजार ५६५ अनुसूचित जातीतील विद्यार्थी, ७९ हजार ५२७ अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील १० हजार २२८ विद्यार्थी असे मिळून २ लाख ४७ हजार १८५ एकूण विद्यार्थ्यांना प्रति गणवेश ४०० रुपयांप्रमाणे गटस्तरावर निधी वितरित करण्यात आला आहे. शिक्षक घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व गणवेशाच्या निधीचे वाटप करणार आहेत. बहुतांश ठिकाणी हे वितरण झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याबाबत क्षेत्रिय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)
गणवेश वाटपासाठी नऊ कोटींच्या अनुदानाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 11:26 PM