लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : महापालिका निवडणुकीच्या माघारी प्रक्रियेनंतर शुक्रवारी रिंगणातील ८३ उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. किरकोळ वादाचे प्रसंग वगळता चिन्ह वाटप शांततेत व सुरळीत पार पडले. शनिवारपासून प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ५३४ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. गुरुवारी १६० जणांनी माघार घेतली तर कॉँग्रेसच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे आता ८३ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २१ प्रभागांमधून ८३ उमेदवार निवडून येणार आहेत. गुरुवारी माघारीची प्रक्रिया पार पडली. शुक्रवारी सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. ज्या-त्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना राजकीय पक्षांची चिन्हे देण्यात आली, तर अपक्ष उमेदवारांना कपबशी, गॅस सिलिंडर, पतंग, बॅट, फुगा, रोडरोलर, कपाट, शिट्टी, सायकल आदी चिन्हांचे वाटप करण्यात आले. तंत्रनिकेतन महाविद्यालयातील केंद्रावर काही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी मध्यस्थी करीत दोघा राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समज देत शांततेचे आवाहन केले होते. आजपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
८३ उमेदवारांना चिन्हांचे वाटप
By admin | Published: May 12, 2017 11:39 PM