लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघा दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना शालेय विद्यार्थ्यांना गणवेष देण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येवून जूनच्या अखेरच्या सप्ताहात गणवेषासाठी निधी वर्ग करण्यात आल्याने गेल्या महिना भरात नाशिक जिल्हा परिषदेच्या ७५ टक्के विद्यार्थ्यांना गणवेष मिळू शकले असून, उर्वरित २५ टक्के विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनापुर्वी गणवेष वाटप करावेत असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीला बजावले आहेत.
अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेष पुरविण्याबाबत शिक्षण विभाग दरवर्षी नवनवीन प्रयोग राबवित असल्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कधीच गणवेष मिळालेले नाहीत. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या बॅँक खात्यावर गणवेषाचे पैसे वर्ग करून त्यांनीच ते खरेदी करावे असा निर्णय घेतल्यामुळे त्यावरून बराच वाद झाला. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना शून्य रकमेवर बॅँकेत खाते उघडावे लागले. मात्र असे खाते उघडण्यास बॅँकांनीही नकार दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे पैसे वेळेत जमा होवू शाकले नाहीत. त्याच बरोबर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेष न घेता पैसे खर्च करून टाकले तर काही बॅँकांनी गणवेषाच्या जमा झालेल्या पैशातून बॅँकेचे शुल्क परस्पर वळते करून घेतल्याने शिक्षण विभागाला वर्षभर हा विषय पुरला. त्यामुळे यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात शासनाने आपलाच निर्णय फिरवून प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेषापोटी सहाशे रूपये देण्याचा निर्णय घेवून शाळा व्यवस्थापन समितीने शालेय पातळीवर गणवेषाची खरेदी करण्याच्या सुचना केल्या. शिक्षण विभागानेच या संदर्भातील निर्णय उशिरा घेतल्याने पुढे त्याच्या अंमलबजावणीत आपसूकच उशिर झाला.नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये दोन लाख, ३९ हजार विद्यार्थी असून, या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे शाळा पातळीवर वर्ग करून गणवेष खरेदीसाठी दरपत्रके, कपड्यांचे मापे घेण्यासाठी विलंब लागल्याने जुलै अखेरपर्यंत एक लाख, ६७ लाख, ६५४ विद्यार्थ्यांना गणवेष वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांना १५ आॅगष्टपुर्वी शाळांनी गणवेष खरेदी करून घेवून द्यावेत असे आदेश प्रशासनाने सर्व शाळा व व्यवस्थापन समितीला दिले आहेत.