पाटोदा : येवला तहसील कार्यालयाच्या वतीने पाटोदा येथे सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत समाधान योजना शिबिराचे प्रांताधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. शिबिरास तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी सुनील अहिरे आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार शरद मंडलिक यांनी समाधान योजंनेचा उद्देश्य समजावून सांगितला. तालुकापातळीवरील प्रत्येक अधिकारी हा ग्रामस्तरावर पोहोचला पाहिजे, हा समाधान योजनेचा मुख्य हेतू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विधवा निवृत्ती वेतन योजना, आम आदमी विमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनांची माहिती देऊन या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे सांगून महसूल विभागअंतर्गत खरीप अनुदान, रेशन कार्ड, वहिवाट रस्ते खुले करण्याबाबत नागरिकांच्या काही समस्या असल्यास निसंकोचपणे तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. गटविकास अधिकारी सुनील अहिरे यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक मंडळ अधिकारी आर. के. खैरे यांनी केले, तर सूत्रसंचालन साहेबराव आहेर यांनी केले. कार्यक्र मास गणपत कांदळकर, पुंडलीक पाचपुते, बाळासाहेब पिंपरकर, अशोक मेंगाणे, कैलास नाईकवाडे, प्रभाकर बोरनारे, सरपंच जयश्री पाचपुते, उपसरपंच सुलताना मुलानी आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)
पाटोद्यात विविध दाखल्यांचे वाटप
By admin | Published: October 01, 2015 12:07 AM