नाशिक : यावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्या प्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलर देखील नाशिक जिल्ह्यात चांगला पहावयास मिळाला. मात्र जमिनीत अजून तितका ओलावा झालेला नाही. जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या. मगच पेरणी करा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांनी केले आहे. यावर्षीचा पारा कधी नव्हे इतका ४० अंशावर गेल्याने जमिनीची तहान अजून भागलेली नाही.
अजून दोन दमदार पाऊस झाल्याशिवाय जमीन ४ इंच ओल हाेणार नाही. नाशिक जिल्ह्यात ७ जूनला मान्सुनचे वेळेवर आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन दिवस जिल्ह्यात सरी चांगल्या बरसल्या. त्यामुळे काही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत तर ७० टक्के शेतकरी अजूनही पेरण्या सुरू कराव्यात की नाही? या संभ्रमात आहे. कारण पेरण्या केल्यावर पाऊस पुन्हा हुलकावनी देऊ शकतो. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. त्यामुळे ‘लाेकमत’ ने या संदर्भात कृषी अधिक्षक सोनवणे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, अजूनही पेरणीयोग्य पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. शेतकऱ्यांनी घाई करू नये. यंदाच्या उन्हाळ्याने शेतजमीन खूप कोरडी झाली आहे. त्यामुळे जमिनीची तहान वाढली आहे. किमान चार ते पाच इंच इतका ओल जमिनीस आल्यावरच पेरणी करणे योग्य राहणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. नोंद घेण्याइतका पाऊस अद्याप झालेला नाही, परंतु पावसाची वेळेत सुरूवात झाली आहे.
६ लाख हेक्टरवर होणार पेरणी
यंदा नाशिक जिल्ह्यात खरिपासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. ऐन पावसाळ्यात खतांची व बियाण्यांचा काळाबाजार होवू नये, यासाठी कृषी तसेच युरिया साडेआठ हजार टन बफर स्टॉक करून ठेवल्यामुळे खतांची टंचाई जाणवणार नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.