नाशिक : शहर परिसरासह जिल्ह्याला रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटात तासभर मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. दिवाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारपेठेत तीन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने व्यापारी वर्गाने तीव्र संताप व्यक्त केला. परिसरात सुमारे ७.६ मि.मी. इतकी पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळपासूनच उकाड्यात वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे पावसाची शक्यता होती. सकाळपासून कडक ऊन जाणवत असताना दुपारनंतर आभाळ दाटून आले. सायंकाळी शहरातील काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. शहरात सायंकाळी ५ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवार असल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहक आणि व्यापाºयांचीही धावपळ झाली. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोडवर प्रचंड गर्दी असताना पाऊस आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची हजेरी कायम होती. जिल्ह्यातील मालेगाव, वणी, चांदवड, देवळा, लोहोणेर, खामखेडा आदी परिसरात सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.मेनरोडसह जुने नाशिक अंधारातपावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड आणि जुने नाशिक परिसरातील वीजपुरवठा सुमारे तीन तास खंडित झाल्याने व्यापारी वर्गाचे हाल झाले. पावसामुळे राजेबहादूर फिडरवर ११ के.व्ही. वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मेनरोड तसेच शालिमार परिसरात अंधार पसरला होता. खंडित वीजपुरवठ्याने व्यापाºयांसह ग्राहकांचीही तारांबळ उडाली. भद्रकाली येथील ११ केव्ही वाहिनीवरदेखील बिघाड झाल्याने जुने नाशिक परिसरातील मोठा भाग अंधारात होता.
नाशिक शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:54 AM