जिल्हा बँकेचा सध्या कर्ज वसुली हंगाम सुरू असल्याने कर्जदारांकडे सुमारे दोन हजार कोटीची रक्कम थकीत आहे. त्यातील १,४५२ कोटीची जुनी थकबाकी आहे. या वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसूल करण्यासाठी बँकेने सन २०१६ पूर्वी कर्ज घेतलेल्या परंतु परतफेड न केलेल्या सुमारे २० हजार कर्जदारांची यादी तयार केली असून, त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. त्यापैकी दहा हजार कर्जदारांचे जिल्हा बँकेव्यतिरिक्त असलेल्या अन्य बँकांतील खाते ॲटॅच करण्यात आले आहे, जेणेकरून सदरचे कर्जदार अन्य बँकेतून आपले व्यवहार करू शकणार नाहीत. यासंदर्भात बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी वसुलीबाबत आढावा बैठक घेऊन जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले तसेच हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांकडील थकबाकी वसुलीसाठी कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार सभासदांनी कटू कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा लवकरात लवकर करून बँकेस सहकार्य करावे, त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली आहे. या योजनेस २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून, सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन बँकेने केले आहे.
जिल्हा बँकेने केले दहा हजार कर्जदारांचे बँक खाते ॲटॅच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:26 AM