नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल (दि.२१) झालेल्या मतमोजणीत अ वर्गासाठी झालेल्या पाच संचालक पदांच्या मतमोजणीत पिंगळे-कोकाटे गटाला दोेन, तर ढिकले गटाला एक जागा मिळाली. नाशिक तालुका संचालक पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा महापालिका स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे यांनी अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव केला. नांदगाव तालुका संंचालक पदाच्या जागेसाठीही शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी माजी आमदार अॅड. अनिल अहेर यांचा २० मतांनी पराभव केला. नाशिक-पुणे महामार्गावर समर्थ मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस कडक पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. पाच टेबलांवर नाशिक, निफाड, सिन्नर, नांदगाव व कळवण या पाच तालुक्यांच्या अ गटासाठीच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरू झाली. अनिल अहेर यांनी आक्षेप घेतल्याने सुरुवातीला नांदगावची मतमोजणी स्थगित करण्यात आली होती. नाशिक तालुका संचालक पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ६५ मतांपैकी ३३ मते शिवाजी चुंबळे यांना, तर ३२ मते देवीदास पिंगळे यांना मिळाल्याने चुंबळेंनी अवघ्या एका मताने धक्कादायक विजयाची नोंद केली. कळवणमधून माजी संचालक धनंजय पवार यांना २६, तर उद्धव अहेर यांना १६ मते मिळाल्याने १० मतांनी धनंजय पवार यांनी विजय मिळविला. निफाड तालुका संचालक पदासाठी माजी आमदार दिलीप बनकर यांना ११५, तर भास्कर बनकर यांना अवघी १७ मते मिळाल्याने तब्बल ९८ मतांनी दिलीप बनकर यांनी विजय मिळविला. सिन्नर तालुका संचालक पदासाठी १०५ मतांपैकी ७५ मते माजी आमदार माणिकराव कोकाटे, सागर जाधव यांना २५ मते मिळाली, तर ५ मते बाद झाली. कोेकाटे यांनी ५० मतांनी विजय मिळविला. दुपारी क वर्गासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार अपूर्व हिरे यांना ११७९, तर स्व. उत्तमराव ढिकले पॅनलचे उमेदवार डॉ. सुनील ढिकले यांना १११६ तर पिंगळे-कोकाटे गटाचे माजी संचालक राजेंद्र भोसले यांना १०२९ मते मिळून ६३ मतांनी आमदार अपूर्व हिरे यांनी विजय मिळविला.
जिल्हा बॅँकेचा कौल संमिश्र; पिंगळे, गिते, भोेसले, अहेर पराभूत नवीन नऊ, तर जुन्या बारा संचालकांना संधी; किरकोळ वाद
By admin | Published: May 22, 2015 1:25 AM