दिंडोरी : जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असून, बँकेतर्फे जिल्ह्यात सर्वाधिक कृषी कर्ज वाटप होत असले तरी अजूनही अनेक शेतकरी कृषी कर्जापासून वंचित आहेत. विविध सोसायट्यांच्या अनिष्ट तफावत कमी करत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा, असे आवाहन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाला केले आहे.
मुंबई विधानभवन येथे झिरवाळ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेच्या कर्ज वाटप, वसुली व टीडीएस कपात आदी अडचणींबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खाजगी सचिव संतोष पाटील यांचे उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाबूशेठ बागमार, जिल्हा बँकेचे प्रशासक एम. ए. अरीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष सचिव मुकेश भोगे, आंबे दिंडोरीचे उपसरपंच सुभाष वाघ, राजेंद्र परदेशी, गोपाळ धूम आदी उपस्थित होते.
यावेळी सचिव पाटील यांनी बँक उर्जितावस्थेत आणण्यासाठी विविध उपाय सुचवत प्रशासक यांना त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या द्याव्यात, असे सांगितले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा जिल्हा बँकेने एवढ्या अडचणीच्या काळातही अनेक सोसायट्यांमधील अनिष्ट तफावत दूर होत सोसायट्यांचे कर्ज वाटप सुरू झाले असून, बँक वाचविण्याच्या दृष्टीने चांगली वाटचाल सुरू आहे. जसे ब वर्गमधील काही सोसायट्यांची अनिष्ट तफावत दूर झाली तसाच प्रयत्न क वर्गासाठी करावा व जास्तीत जास्त कर्ज वाटप करावे.
-----------------------
अनिष्ट तफावत ५० टक्के कमी करावी
बैठकीत सर्व सोसायट्यांचे क्रमपत्र बनवावे कर्ज वाटपाची तयारी करावी, अनिष्ट तफावत ५० टक्के कमी करावी, कर्ज वसुली करताना जे खातेदार कुटुंबातील व्यक्तीच्या ठेवी, खात्यातील रक्कम संमती घेऊन वर्ग करत असतील तर करून घ्याव्या. त्यासाठी टक्केवारीची अट ठेवू नये, शेतकरी अत्यंत अडचणीतून जात असताना कर्जवसुली मोहिमेत शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, लिलाव थांबवावे, वनटाइम सेटलमेंट योजना प्रभावीपणे राबवावी त्यासाठी इतर बँक ज्याप्रमाणे धोरण राबवते ते राबवावे आदी सूचना करण्यात आल्या. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, माजी आमदार जयंत जाधव, माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शेतकरी बाबूशेठ बागमार यांनी विविध सूचना मांडल्या.