यासंदर्भात गेल्या आठवड्यातच सहकारी निवडणूक प्राधिकरणाने याबाबतचे आदेश काढून विविध सहकारी सोसायट्यांच्या स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकांची कार्यवाही १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिल्याने त्यानुसार सहकारी सोसायट्यांच्या बैठका व मतदान प्रतिनिधींचे ठराव करण्याच्या कार्यवाहीस सुरुवात केली आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त झालेले ठराव २३ फेब्रुवारी रोजी बँकेला देण्यात येतील. येत्या २ मार्च रोजी बँकेची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर २२ मार्चपर्यंत या यादीवरील हरकती नोंदवून घेतल्या जातील. ५ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्हा बँकेची मुदत मे २०२० मध्येच संपुष्टात आली असून, तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यापासूनच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता व शेकडो सोसायट्यांनी आपले ठरावही जिल्हा बँकेकडे सुपुर्द केले होते. तथापि, मार्च महिन्यात काेरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले व त्यातून पुढे दर तीन महिन्यांनी सहकारी बँकांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर पडली. आता मात्र राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील दर्शविला असून, बँकेच्या मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यामुळे मे महिन्यात जिल्हा बँकेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.