शहरासह ग्रामीण भागातसुद्धाही कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सरकारकडून विविध प्रकारचे कडक निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधांची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. तपासणी नाक्यांवर फिक्स पॉईंट सक्रिय करण्यात आले आहेत. आठ तपासणी नाक्यांवर पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड असा एकूण सुमारे २०० पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले, तसेच जिल्ह्यातील एकूण ४० पोलीस ठाणेनिहाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि २ हजार कर्मचारी, १ हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, तसेच राज्य राखीव दलाच्या जवानांची एका तुकडीलाही अतिरिक्त कुमक म्हणून पाचारण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आंतरराज्य सीमा ओलांडून दुसऱ्या जिल्ह्यात अत्यावश्यक गरजेच्या कारणांनी प्रवास करावयाचा असल्यास त्यांच्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ‘ई-पास’ची सुविधा देण्यात आली आहे. त्यासाठी गरजू नागरिकांनी संकेतस्थळाचा वापर करत पास प्राप्त करून घ्यावयाचा असल्याचे पाटील म्हणाले. ‘ई-पास’ प्राप्त झाल्यानंतरसुद्धा प्रवासाकरिता असलेली वाहने आणि त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन कराो आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.