पेठ : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यास नागरिक धजावत नसल्याने याच तालुक्यातील फणसपाडा या गावचे भूमिपूत्र व सध्या मध्यप्रदेशात उज्जैन येथे विभागीय जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. योगेश भरसट यांनी पुढाकार घेऊन गावच्या लोकांचे प्रबोधन करून आरोग्य विभागाच्या मदतीने राबवलेल्या लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, छोट्याशा पाड्यावर १०० नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
डॉ. योगेश भरसट हे त्यांच्या खाजगी कामानिमित्त फणसपाडा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी गावातील नागरिकांशी बोलताना कोविड लसीकरणाचा आढावा घेतला. ग्रामीण भागात काही गैरसमज व अफवांमुळे नागरिक लस घेण्यासाठी घाबरत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गावातील कोतवालाला गावात दवंडी पिटवून लोकांना मंदिरात जमा व्हायला सांगितले. गावातील लोक जमा झाल्यावर त्यांनी लोकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की, मी उज्जैन येथे बस स्टँडचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर केले व तेथे पाचशे रुग्णांवर स्वतः उपचार करून त्यांना कोरोनामुक्त केले. त्यावेळी जे काही मृत्यू झाले त्यापैकी कुणीही लस घेतली नव्हती. तेथे लस घेतलेल्या एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. गावातील नागरिकांचे प्रबोधन करून पेठ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी गावात कोविड लसीकरण मोहीम राबविली. गावातील लोकांनी लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत १०० नागरिकांनी लस टोचून घेतली. डॉ. योगेश भरसट यांनी स्वतः पन्नास व्यक्तींचे लसीकरण केले. विशेष म्हणजे पेठ तालुक्यातील फणसपाडा हे पहिलेच असे गाव आहे की एकाचं दिवशी एवढ्या लोकांनी लसीकरण करून घेतले.
याप्रसंगी पेठ ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जाधव, बाळासाहेब चौधरी, आरोग्य सहायक राजेंद्र तवर, जाहुली गांगोडा, महेश घोलप, वैशाली अलबाड,ज्ञानेस्वरी भोये, किशोर आमनोर, गट प्रवर्तक नंदा ठाकरे, आशा विमल बामने, प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुभाष ठाकरे, अंगणवाडी ता. मीराबाई, अशोक महाले, देवदत्त चौधरी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
--------------------
नाशिकसह महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याने नागरिक लसीकरण करून घेत नाहीत. अशा वेळी खेड्यातून उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या युवक, कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी स्वतःच्या जन्मभूमीला भेट देऊन नागरिकांचे प्रबोधन करून लसीकरण मोहीम राबवल्यास कोरोनापासून आपल्या समाजाचे संरक्षण होऊ शकेल.
-डॉ. योगेश भरसट, फणसपाडा ता. पेठ
-------------------
फणसपाडा, ता. पेठ येथे लसीकरण मोहिमेप्रसंगी सनदी अधिकारी डॉ. योगेश भरसट, डॉ. योगेश मोरे, बाळासाहेब चौधरी आदी. (१५ पेठ २)
===Photopath===
150621\15nsk_3_15062021_13.jpg
===Caption===
१५ पेठ २