नाशिक : ‘आमच्या घराजवळ थांबू नका’ असे म्हटले म्हणून मनात राग धरून तीघांनी जेलरोडवरील भीमनगर भागात एका सोसायटीच्या सदनिकेत बळजबरीने घूसुन दोघांना लोखंडी पाईपने जबर मारहाण करत त्यांचा खून केला होता. या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी तीघांना जन्मठेप व प्रत्येकी २५ हजारांचा दंड अशी शिक्षा गुरूवारी (दि.२६) सुनावली.जेलरोडवरील संघमित्र हौसिंग सोसायटीत १६ जानेवारी २०१६ साली आरोपी प्रविण उर्फ विठ्ठल प्रकाश आव्हाड (३५), आशिश उर्फ बाळा मच्छिंद्र पगारे ( ३०), आतिश उर्फ काळु शाम पवार (२९) यांनी सुमेध सुनील गुंजाळ याच्या राहत्या घरात बळजबरीने घुसून रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास सुमेध व त्याचा मित्र स्वप्निल शामराव दोंदे यास लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत सुमेध व स्वप्निल हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तीघांनी पलायन के ले होते. उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.दं.वि कलम ३०२/३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक निवांत जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या गुन्ह्याच्या सिध्दतेसाठी फिर्यादी, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात महत्वाचे ठरले. सरकारी अभियोक्ता अॅड. एन.जी.निंबाळकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.न्यायालयाने खूनाच्या गुन्ह्यात प्रविण, आशिश, आतिश या तीघांना दोषी धरत जन्मठेप व प्रत्येकी २५ हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावासदेखील आरोपींना भोगावा लागू शकतो. या खटल्याप्रकरणी गुन्हा शाबित होण्यासाठी पैरवी अधिकारी हवालदार काशिनाथ गायकवाड यांनीही वेळोवेळी पाठपुरावा केला. या गुन्ह्यात संशयित समाधान उर्फ पप्पू आहिरे, नितीन उर्फ बाबा जगन जाधव या दोघांविरूध्द सबळ पुरावे न आढळून आल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोेष मुक्तता केली.