उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज गुरुवारपासून सकाळी १०.३० ते १ व दुपारी १.३० ते ४ या दोन सत्रांत चालले. पुढील आदेशापर्यंत यानुसार कामकाज सुरु राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रत्येक सत्र केवळ अडीच तासाचे असेल असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. यानुसार गुरुवारी दोन सत्रांत जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाज पार पडले. दुपारी चार वाजेनंतर न्यायालयीन कामकाज थांबविण्यात आले होते.
उच्च न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे न्यायाधीशांच्या नावांसह त्यांच्या कामकाजाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. यानुसारच न्यायदानाची प्रक्रीया पुढील काही दिवस चालणार असल्याची माहिती सुत्रांदी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गर्दी कमी करण्याचे आवाहन करुनही गर्दी कमी होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. न्यायालयातही काेरोनाचा शिरकाव होत आहे. यापुर्वी काही वकिलांना कोरोनाची बाधा झाली होती. दरम्यान, खबरदारी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने दोन सत्रांत न्यायालयीन कामकाजाची विभागणी केली आहे. त्यानुसार पहिल्या सत्रात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्यासह अन्य सहा न्यायाधीशांच्या न्यायालयात न्यायदानाचे कामकाज चालणार आहे. दुपारी दीड ते चार वाजेच्या सत्रामध्ये न्यायालयाती केवळ सहा न्यायाधीशांचे न्यायालय चालविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.