लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशपातळीवर लॉकडाउन व संचारबंदीची घोषणा केल्याने मुंबई, ठाणे या महानगरांमध्ये वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय मजुरांनी आपल्या मूळ प्रांतात परतण्याच्या चालविलेल्या प्रयत्नात पोलिसांनी जागोजागी केलेल्या नाकाबंदीत सापडलेल्या सुमारे दीड हजार मजुरांची जिल्ह्यात ठिकठिकाणच्या निवारा शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी स्थलांतरित मजुरांना अन्न, वस्त्र व निवाºयाची सोय करण्यात आली असून, आणखी दहा दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना आहे त्याच ठिकाणी राहण्याच्या सूचना करण्याबरोबरच सर्व प्रकारचे उद्योग धंदे बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले असून, काम, धंदे नसल्याने लोक सैरवैर झाले आहेत. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे, भिवंडी याभागात रोजगारासाठी गेलेल्या मजुरांनी आपल्या मूळ गावाकडे मिळेल त्या वाहनाने, पायीच रवाना होत असून, जिल्ह्याच्या सीमांवर ठिकठिकाणी असलेल्या चेकनाक्यांवर या मजुरांना अडविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या मजुरांना निवारा शेडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यात १८ ठिकाणी निवाराशेड करण्यात आले असून, या निवाराशेडमध्ये एकाच वेळी सुमारे अडीच हजार लोकांची व्यवस्था होऊ शकते. गेल्या चार ते पाच दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांत सापडलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक मजुरांना या शेडमध्ये ठेवण्यात येत असून, त्यात सर्वाधिक ७२६ मजूर उत्तर प्रदेशातील आहेत. या सर्वांना आपल्या मूळ गावी परतायचे होते. त्यातील बहुतांशी मजुरांना इगतपुरी तालुक्यातील प्रिंप्रीसदो येथील एकलव्य इंग्रजी मीडियम शाळेत ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईहून मालगाडीद्वारे हे मजूर इगतपुरी रेल्वेस्थानकात उतरले होते.