लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना अखेर राज्य शासनाने निलंबित केले असून, यासंदर्भातील आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याने त्यांना तातडीने पदमुक्त करण्यात आले आहे. डेकाटे यांचा पदभार डॉ. दावल साळवे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गेल्या वर्षी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे डेकाटे यांनी पैशांची मागणी केल्याने त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हा दाखल केला होता.
गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद प्रशासनाने डेकाटे यांना पदमुक्त केले. गेल्यावर्षी तालुका वैद्यकीय अधिका-याकडे डेकाटे यांनी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभासाठी तालुका वैद्यकीय अधिका-यांकडून वर्गणी गोळा करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली, असे डेकाटे यांचे म्हणणे होते. परंतु प्रत्यक्षात तालुका वैद्यकीय अधिका-याची रजा मंजुरीच्या मोबदल्यात डेकाटे यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रार होती. यासंदर्भात डेकाटे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार नोंदविण्यात आली असता पोलिसांनी या तक्रारींची खातरजमा केली होती व त्यासाठी डेकाटे यांनी केलेल्या पैशांच्या मागणीचे पुरावेही हाती लागले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर डेकाटे यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळविला. त्यानंतर जवळपास तीन महिने ते रजेवर गेले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी कामावर रूजू होण्याचा प्रयत्न केला असता, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी नकार दिला होता. तर त्यानंतर आलेल्या भुवनेश्वरी यांनी डेकाटे यांना रूजू करून घेतले होते. तेव्हापासून डेकाटे यांनी पुन्हा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कामकाज पाहण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, मात्र तक्रारदार तालुका वैद्यकीय अधिकाºयांनी यासंदर्भात शासनाकडे आपल्या तक्रारी कायम ठेवल्या, त्याचबरोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही आपला अहवाल शासनाकडे रवाना केला होता. त्याची दखल घेऊन सामान्य प्रशासन विभागाने डॉ. विजय डेकाटे यांना सेवेतून निलंबित केले आहे.