लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्वाईन फ्लू कक्षात चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ यापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर सुरू असून उर्वरित तिघांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ या तिघांचाही अहवाल अद्याप आला नसला तरी त्यांना टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या सुरू करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे़गत शनिवारी जिल्हा रुग्णालयात एका स्वाईन फ्लूग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला़ त्यामुळे शहरात पुन्हा या रोगाने डोके वर काढले असून त्यादृष्टीने खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे़सद्यस्थितीत स्वाईन फ्लू कक्षामध्ये तीन महिला व एक पुरूष असे चार रुग्ण असून दोन जण संगमनेर, एक चांदवड तर एक जण नाशिकचा आहे़ दरम्यान, नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या विविध साथजन्य रोगांबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे़ नागरिकांनी गर्दी टाळण्याचे तसेच स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़जी़एम़होले यांनी केले आहे़
जिल्हा रुग्णालयात चार स्वाईन फ्लू रुग्ण दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:39 PM