नाशिक : म्युकरमायकोसिस रुग्ण आढळून येण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्ह्यातील आठ रुग्णालयांचा समावेश जनआरोग्य योजनेत केला आहे. त्यातील मुख्य रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील शस्रक्रियेसाठीचा विभाग येत्या आठवडाभरात कार्यान्वित करण्यात येणार आहे. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येने तसेच त्यावर आवश्यक असणाऱ्या ॲम्फोटेरेसिन इंजेक्शनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना लाखोंचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालय, मालेगावचे शासकीय रुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, एसएमबिटी रुग्णालय यासह नामको हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल आणि वाेक्हार्ट हॉस्पिटल यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ऑपरेशन्ससाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग अस्तित्वात नव्हता. तसेच त्यासाठी लागणाऱ्या न्यूरोसर्जनसह अन्य विशेष सर्जन्सचा अभाव असल्याने त्यासाठी गरजेनुसार त्यांना ऑन कॉल बोलावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशन्ससाठीच्या थिएटरची पूर्ततादेखील आठवडाभरात करण्यात येणार आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी म्युकरमायकोसिस आजारामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. तसेच म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करणे सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही. तसेच प्रत्येक रुग्णास दररोज किमान सहा ते आठ इंजेक्शन याप्रमाणे ८० ते १०० इंजेक्शन लागतात. ज्यांची अधिकृत किंमतच प्रतिइंजेक्शन साडेपाच ते साडेसात हजार असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाचा केवळ इंजेक्शन्सचा खर्चच ७ लाखांवर जातो. अशा परिस्थितीत सामान्य रुग्णांना हा खर्चच परवडणारा नसल्यानेच शासनाने त्याचा अंतर्भाव योजनेत केला आहे.
इन्फो
ऑपरेशन थिएटरची पूर्तता लवकरच
सध्या जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आम्ही आडगाव मेडिकल कॉलेज रुग्णालय किंवा एसएमबीटी कॉलेज रुग्णालयात हस्तांतरित करीत आहोत. मात्र, येत्या आठ दिवसांत जिल्हा रुग्णालयात म्युकरमायकोसिस रुग्णांच्या ऑपरेशनची पूर्तता करण्यात येणार असून, त्यानंतर जिल्हा रुग्णालयातही रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया शक्य होईल.
डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक