धनंजय रिसोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणा-या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अजूनही पारंपरिक आणि खनिज इंधनांचाच वापर केला जातो; मात्र आता नाशिक जिल्ह्यात अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठीच्या वीजनिर्मितीला चालना देण्यात आली असून, पुढील वर्षापासून जिल्ह्यात ५० मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे.
राज्य शासनाने २०१७ साली प्रारंभ केलेल्या मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात ५० मेगावाॅट निर्मिती केली जाणार आहे. त्याचवेळी राज्यभरात पहिल्या टप्प्यात १८४ मेगावाॅट सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. तर त्यापुढील टप्प्यांमध्ये अनुक्रमे १०० मेगावाॅट आणि १७९ मेगावाॅट ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पांना प्रारंभ करण्यात येणार आहे. २००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरायोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. सध्याच्या काळात अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच आवश्यक तेवढाच वापर आणि शक्य तितकी बचत हाच ऊर्जा संवर्धनाचा सर्वश्रेष्ठ पर्याय असल्याने त्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनीदेखील नियोजन करणे अत्यावश्यक झाले आहे.
इन्फो
शेतीला मिळेल दिवसा वीज
राज्यातील अनेक भागात रात्री, अपरात्रीच कृषी पंपांसाठी वीज उपलब्ध होते. त्याऐवजी पुढील वर्षापासून या सौर विजेचा वापर हा प्रामुख्याने कृषी फिडर असणाऱ्या सबस्टेशन्ससाठी केला जाणार आहे. त्यात स्थानिक फिडरच्या गरजेनुसार २ ते २५ मेगावाॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात या सौर ऊर्जेव्दारे शेतातील कृषी पंपांना दिवसादेखील वीज मिळू शकणार आहे.
इन्फो
अपारंपरिकच्या वापरात हवी वाढ
अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने समस्यांची बरीच उत्तरे मिळू शकतात. त्यामुळेच सौर, पवन, कृषी अवशेष, जल, सेंद्रिय कचरा, जैव–अवशेष, जैविक गॅस, बायोडिझेल, सीएनजी इत्यादींपासून मिळणा-या ऊर्जेचा वापर वाढवणे आवश्यक झाले आहे. सोलर हिटर, सौरदिवा तसेच अन्य सौर उपकरणांच्या वापरावर भर देण्यासह ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, महामार्ग, मैदाने या ठिकाणीसुध्दा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील. ज्या इंधनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली, त्याचा निम्मा भाग आपण गत २०० वर्षातच खर्च केला आहे. त्यामुळेच गत दीड शतकात या पृथ्वीचे तापमान १ अंशाने वाढले असून, या शतकाअखेरीस तब्बल ५ ते ६ अंशांनी वाढण्याची शक्यता असल्याने ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.