नाशिक : जिल्ह्यासह शहरातही आता कोरोनाचा फास अधिक भक्कम होत चालला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून गावठाण व झोपडपट्टी भागांत कोरोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता वाढली आहे. शुक्रवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील विविध उपनगरांमध्ये एकूण ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे आता मनपा हद्दीतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७ इतका झाला असून, मालेगावमध्ये दिवसभरात केवळ एक रूग्ण आढळून आला. जिल्ह्याची कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ९०३वर पोहचली आहे. यामध्ये नाशिक मनपा-६७, नाशिक ग्रामिण-१११, मालेगाव मनपा-६८६, जिल्हा बाह्य३९ अशी आकडेवारी आहे.शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिकमध्ये गुरूवारी मध्यरात्री दोन कोरोनाबाधित रूग्ण आढळले तर शिवाजीवाडी या नासर्डीनदीच्या काठालगत असलेल्या झोपडपट्टीमध्येही एक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आला. तसेच शुक्रवारी प्राप्त अहवालात वडाळागावातील अण्णाभाऊ साठेनगर या झोपडपट्टीमध्येही कोरोनाबाधित रूग्ण मिळून आला. तसेच अंबडलिंकरोड भागातील हमीदनगरनमध्ये दोन रुग्ण आढळले आहे. यामध्ये ७वर्षाचे दोन मुलामुलींचाही समावेश आहे. तसेच पेठरोडवरील रामनगर झोपडपट्टी भागातही ३६ वर्षाचा तरूण कोरोनाबाधित आढळला आहे. सिडको येथील इंदिरा गांधी वसाहतीतदेखील ४७ वर्षांची महिला कोरोनाबाधित आढळली. अंबड-सातपुर लिंकरोड भागातील एकूण ६ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालातून समोर आले आहे. याच भागात हमीदनगर नावाची वसाहत असून येथेही दोन रुग्ण मिळून आले आहे. वडाळागावातील कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा शुक्रवारी ४ झाला. तसेच जुन्या नाशकातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता तीन वर पोहचला आहे. वडाळ्यातील रजा चौक परिसर व साठेनगरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामध्ये मोठा राजवाडा, नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा या भागांचा समावेश आहे.शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.शहराचा गावठाण व अत्यंत दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने नाशिकनंतर आता वडाळागावातदेखील कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे आता परिस्थिती गंभीर बनत चालली असून नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या.नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलता येताच नागरिकांचे जत्थे शहरात पहावयास मिळत आहे. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान शहरातील बाजारपेठांचा परिसर गजबजून जात आहे.
जिल्ह्याचा आकडा ९०३ वर : शहरात आज ११ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:40 PM
शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे.
ठळक मुद्देनागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यकनागरिकांनी घराबाहेर पडू नयेवडाळागावात कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा ४