नाशिक : येत्या ५ आॅक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाबाबत आतापासूनच इच्छुकांनी आरक्षणाचे आडाखे बांधण्यास सुरुवात केली असून, दिंडोरी, इगतपुरी, पेठ, कळवण, पेठ तालुक्यांतील बहुतांश गट अनुसूचित जमातींसाठी आरक्षित होण्याची शक्यता असल्याने सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांची घालमेल वाढली आहे.नव्याने जिल्ह्णात सात नगर परिषद व पंचायत जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे गट कमी होतील, अशी आशंका व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये एकही घट किंवा वाढ होणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. फक्त चांदवड तालुक्यातील पाच गटांऐवजी चार गटांची रचना आणि नांदगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांऐवजी चार गटांची प्रारूप रचना तयार करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे चांदवडमधून चांदवड गट कमी होऊन नांदगावमध्ये बोलठाण किंवा जातेगाव गट अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत ५ आॅक्टोबर पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यापूर्वी गटांची रचना आणि लोकसंख्या यांची यथोचित माहिती घेऊन त्यानुसार पुढील राजकीय रणनिती आखण्याच्या प्रयत्नात ज्येष्ठ सदस्य गुंतले आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांच्या संख्येत २९ गट अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठी राखीव राहण्याची, तर चार गट अनुसूचित जाती (एससी) संवर्गासाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिकला अनुसूचित जमाती गटांची संख्या २६, तर अनुसूचित जाती संवर्गातील गटांची संख्या पाच इतकी होती. यावर्षी अनुसूचित जाती संवर्गाचा एक गट कमी होण्याची शक्यता आहे. २१ गट इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी), तर १८ गट सर्व साधारण (खुल्या) संवर्गासाठी राखीव राहणार आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या २०११ च्या लोकसंख्येनुसार साधारणत: बागलाण, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात प्रत्येकी तीन गट, कळवण तीन, दिंडोरी-पाच किंवा सहा, पेठ दोन पैकी एक, सुरगाणा तीन पैकी दोन तसेच नाशिक, निफाड, सिन्नर, चादंवड, मालेगाव, देवळा येथील प्रत्येकी एक गट अनुसूचित जामती संवर्गासाठी राखीव होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जि. प. निवडणूक : दिंडोरी, इगतपुरी, पेठ, सुरगाण्यात बहुतांश गट आरक्षित?
By admin | Published: September 14, 2016 1:05 AM