नाशिक : पाच वर्षांपूर्वी पेठ तालुक्यातील कापुरझिरा येथील मुलींच्या बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात एका अल्पवयीन पीडितेवर अधीक्षकाच्या मुलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी बालगृहाच्या अधीक्षक असलेल्या आरोपी सुशीला शंकर अलबाड व त्यांचा मुलगा अतुल शंकर अलबाड यांना दोषी धरले. दोघांना दहा वर्षे सक्तमजुरी व वीस हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली.पेठ तालुक्यातील कापुरझिरा गावात असलेल्या संचित मुलींचे बालगृह आहे. २०१५साली या बालगृहाच्या अधीक्षक कार्यालयात दिवाळीच्या निमित्ताने अल्पवयीन पीडित मुलीला बोलावून घेत आरोपी अतुल याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत शारीरिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. यानंतर पीडितेने बालगृहाच्या अधीक्षक असलेल्या सुशीला यांना ही बाब सांगितली असता त्यांनीसुद्धा तिची मदत करण्याऐवजी ह्यतूच माझ्या मुलाच्या मागे लागलीह्ण, असे सांगून मारहाण करत शारीरिक-मानसिक त्रास दिला होता. याबाबत पेठ पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध ३७६ (क), (ड) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यानन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. सोमवारी (दि.७) खटल्याची अंतिम सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत परिस्थितीजन्य सबळ पुराव्यांच्याअधारे संशयित अतुल अलबाड व त्याची आई सुशीला अलबाड यांना दोषी धरले. त्यांना या गुन्ह्यात दहा वर्षांची सक्तमजुरी व वीस हजारांचा दंड आणि दंड न भरल्यास दोन वर्षांचा अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावत वेळीच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन महिला सहायक निरीक्षक कमलाकर यांनी केला.