लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा नेमबाजी संघटनेचे अद्वैत जोशी, आदित्य गाडे, सुहानी भोसले, मनोज जोशी हे पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र रायफल असोसिएशनने नुकतीच सहा ठिकाणी राज्यस्तरीय निवड चाचणी ठेवली होती. पुणे , मुंबई, पनवेल, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा सहा ठिकाणी कोविडचे नियम पाळून स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये १० मीटर पिस्तुल , पीप साईट रायफल व ओपन साईट रायफल अशा ३ प्रकारात स्पर्धा खेळविण्यात आल्या. नाशिकमध्ये या स्पर्धा १० जानेवारीला सातपूर येथील भीष्मराज बाम मेमोरियल नेमबाजी रेंजवर भरविण्यात आल्या होत्या. अद्वैत जोशी हा नेमबाज १० मीटर एअर पिस्तोल या क्रीडा प्रकारात जी. व्ही. मावळनकर व वेस्ट झोन नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर आदित्य गाडे हा युवा पिस्तुल नेमबाज युवा गटात पात्र ठरला आहे. हे दोघेही नेमबाज सातपूर येथील एक्सेल टार्गेट शुटर्स असोसिएशन येथे मोनाली गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव करतात. तर सुहानी भोसले ही युवा पिस्तुल नेमबाज व मनोज जोशी हा पीप साईट एअर रायफल या क्रीडा प्रकारात पूर्व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सुहानी व मनोज हे नेमबाज नाशिक जीमखाना येथे श्रध्दा नालामवर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. जिल्हा नेमबाजी संघटनेच्या अध्यक्ष शर्वरी लुथ यांनी पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र नेमबाजांचे अभिनंदन केले आहे.