नाशिक : शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे. सध्या मागणीनुसार व उपलब्धतेनुसार रेशन दुकानात तूरडाळ स्वस्त दरात मिळत असली तरी ती गुणवत्तेबाबतच्या तक्रारींमुळे तूरडाळीसह कडधान्याचा सुमारे १८० क्विंटल साठा पडून आहे. कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून, किराणा दुकानात उडीदडाळ ११० ते १२० व मूगडाळ शंभर ते ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. मागील एक आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला असून, स्थानिक बाजारपेठांमध्ये डाळींचे भाव कडाडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागाने सर्वाधिक मागणी असलेल्या पाच तालुक्यांच्या मागणीच्या आधारे ७२० क्विंटल डाळीची मागणी शासनाकडे केली आहे. मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेशमधूनही डाळींचा पुरवठा होतो. परंतु, यावर्षी परतीच्या पावसाने राज्यात खरिपाचे मोठे नुकसान केले असून, याच कांदा, कापूस, सोयाबीनसह तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अपेक्षेप्रमाणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन डाळींचे उत्पादन बाजारपेठेत येऊ शकले नाही. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचे भाव वाढण्याची शक्यता असून, सामान्य घटकालाही मागणीनुसार डाळींचा पुरवठा होण्यासाठी तालुकास्तरावरून प्राप्त मागणीनुसार जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे डाळींची मागणी नोंदवली आहे. डाळी शंभरीपार नाशिकच्या बाजारात तूर, मूग, हरबरा, उडीद, मूग आदी डाळींच्या किमतीने शंभरी गाठली असून, डाळींच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली आहे. मागणी आणि पुरवठ्यासोबत उपलब्धतेचा विचार करून जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियमित प्रक्रियेतून ही मागणी केली असून, लवकरच ही डाळ उपलब्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा पुरवठा विभागाची सातशे क्विंटल तूरडाळीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:32 PM
नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदविली आहे.
ठळक मुद्दे शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर शंभरी पार जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली