नाशिक : जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात झुरळ आढळल्या प्रकरणाची चित्रफीत काही वृ्त्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सकांनी असा कोणताही प्रकार प्रत्यक्षात नसल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना फटकारले. सर्वसामान्यांसाठी असलेल्या रुग्णालयाबाबतच्या काही त्रुटी समेार आल्या असतील तर त्या सकारात्मकतेने सोडविण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे सांगून तत्काळ उपायोजना करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात अग्निविरोध यंत्रणा मुदतबाह्य झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच याच कक्षातील अस्वच्छतेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये रुग्णालातील नवजात शिशू कक्षात झुरळांचा संचार असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रक काढून रुग्णालयाच्या भिंती जुनाट झाल्याने, तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांबरोबर असलेल्या साहित्यातूनही येऊ शकतात, असा युक्तिवाद केला होता.
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात माध्यमांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी झुरळ नवजात शिशू कक्षात आढळून आले नसल्याची भूमिका घेतली. विशेष म्हणजे हे झुरळे जिल्हा रुग्णालयातीलच असतील याविषयी शंका उपस्थित केल्याने या प्रकरणात तथ्य नसल्याचे विधान केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना स्वच्छतेच्या मुद्यावर जबाबदारीने विधान करण्याचे त्यांना सांगितले. या प्रकरणातून जे मुद्दे पुढे आले आहेत त्यानुसार उपायोजना करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, यासाठी लागणारा निधी देण्याची प्रशासनाची तयारी असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात येणारे सामान्य नागरिक असल्याने स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे आपली जबाबदारी असल्याचे सांगून तत्काळ उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी होणाऱ्या खर्चाला कार्योत्तर मंजुरी देण्याची तयारीदेखील जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शविली.
--इन्फो---
अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीबाबत शंका
जिल्हा रुग्णालयात एका १३ वर्षीय मुलीची प्रसूती करण्यात आल्याच्या प्रकरणावरून माध्यमांनी विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकित्सकांनी मुलीच्या नातेवाइकांनी मुलीचे वय २० नमूद केल्याचे सांगून मातेची प्रथम सुटका करणे या वैद्यकीय तत्त्वानुसार प्रसूती करण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले. याबाबतचे स्पष्टीकरण देण्याचे आदेशदेखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले.