नाशिक : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसाने गोदावरी, दारणा, कादवा, बाणगंगा, विनता, पाराशरी व गिरणा या नद्यांना मोठा पूर आला असून, निफाड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदाकाठच्या गावांना महापुराचा तडाखा बसला असून, बाणगंगा, कादवा व पाराशरी या नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर गोदाकाठची शेकडो हेक्टर सोयाबीन व भाजीपाला पिके पुराच्या पाण्याखाली आहेत.चाटोरी येथील नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली असून, चाटोरी ते नागापूरदरम्यान गोदावरीच्या दोन्हीही काठावर शेतात पाणी शिरल्याने या तीन किलोमीटरच्या अंतरात फक्त पाणीच दिसत आहे. चाटोरी गावात दुपारी १२ वाजेनंतर पाणी शिरले. कळवण तालुक्यातील पिळकोससह परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने गिरणा नदीला पुन्हा महापूर आला. गिरणा शेतातून वाहू लागल्याने मका, कोबी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारपासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. जोरदार मुसळधारेने पूर्व भागाला चांगलेच झोडपून काढले आहे. कसारा घाटात रेल्वेमार्गावरील रुळावर मध्यरात्री दरड कोसळल्याने नाशिककडे येणारा एकेरी रेल्वेमार्ग ठप्प झाला होता. मात्र या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे देविगरी एक्स्प्रेस कसारा स्थानकातच थांबवली. पेठ तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला असून, सर्व कामकाज ठप्प झाले आहे. पेठ-जोगमोडी रस्त्यावर संगमेश्वर नदीला पूर आल्याने तालुक्याचा उत्तरेकडील संपर्क तुटला. चांदवड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधारेने जांबुटके धरण ९५ टक्के भरले असून, परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून, या धरणावर सात ते आठ गावांची पिण्याचा पाण्याची नळ योजना अवलंबून आहेत.पेठ तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आल्याने जवळपास १०० गावांचा संपर्क तुटला असून, सर्व कामकाज ठप्प झाले आहे.
जिल्ह्याला पावसाने झोडपले
By admin | Published: August 02, 2016 11:09 PM