नाशिक : केंद्र व राज्य सरकारने कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील केल्याने नागरिकांना प्रवासाला मूभा देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर वाढण्याबरोबरच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची माहिती त्या त्या जिल्ह्याच्या यादीत धरली जात नसल्याची बाब लक्षात येताच यापुढे ज्या जिल्ह्यात कोरोनाचा रूग्ण आढळला त्याची नोंद त्याच जिल्ह्यात करण्यात यावी अशा सुचना राज्याच्या आरोग्य संचालकांनी दिल्या आहेत.कोरोनाच्या लॉकडाऊन व संचारबंदीत शिथीलता आणल्यामुळे राज्यातील पुणे, मुंबई, नागपुर, औरंगाबाद, नाशिक या मोठ्या शहरातून बरीच कुटूंबे मागील काही दिवसांपासून मूळ गावी परतलेली आहेत. अशा काही व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची चाचणी करण्यात येत आहेत. त्यात सदरची व्यक्ती कोरोना बाधित असल्यास त्या व्यक्तीची नोंद तो ज्या ठिकाणी रहिवासासाठी गेला तेथे न करता तो ज्या ठिकाणाहून आला आहे त्या जिल्ह्यात केली जात आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होण्याबरोबरच आकडेवारीची लपवाछपवी केली जात असल्याचा संशय राज्याच्या आरोग्य विभागाला होता. त्यामुळे या संदर्भात आरोग्य संचालकांनी सर्व जिल्हा शल्य चिकीत्सक व आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवून यापुढे कोरोना बाधित रूग्ण ज्या गावात वा शहरात सापडल्यास त्याची नोंद त्याच गावात केली जावी अशा सुचना दिल्या आहेत.दरम्यान, आरोग्य संचालकांनी दिलेल्या सुचनांनुसार यापुढे जो व्यक्ती ज्या गावात कोरोना बाधित सापडल्यास त्याच गावात त्याची नोंद करण्यात येणार असल्याने कोरोनाच्या रूग्णांची खरी आकडेवारी समोर येण्यास मदत होणार आहे.