लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत आयोजित केला जाणारा युवा महोत्सव शनिवारी ऑनलाईन रंगला. त्यात कथ्थक आणि शास्त्रीय गायनासह अन्य प्रकारांमध्ये १७ जणांनी सहभाग नोंदवला.
देशभरात दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन होऊन स्पर्धकांची विभाग स्तरावर आणि त्यातून गुणी कलावंतांची निवड होऊन राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो. त्यानुसार सन २०२०-२१ या वर्षाचे जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने २६ डिसेंबरला करण्यात आले होते. गुगल मिट या ॲपवर आयोजित जिल्हास्तरीय महोत्सवात १७ जणांनी सहभाग नोंदवला. त्यात लोकनृत्य, लोकगीत, शास्त्रीय नृत्याचे सर्व प्रकार, शास्त्रीय गायन, विविध वाद्यांचे शास्त्रीय वादन, वक्तृत्व स्पर्धा, तसेच हिंदी आणि इंग्रजी एकांकिकांचा त्यात समावेश होता.